
मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिल रोजी जगातील सर्व देशांवर परस्पर शुल्क लादले. त्यानंतर जगातील शेअर बाजारात गोंधळ उडाला. आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, भारत, चीन आणि अगदी यूएस शेअर मार्केटही 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आपटले. यामुळे जगभरातील शेअर मार्केटमधील कोट्यवधी गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले. सेन्सेक्स, निफ्टी, नॅसडॅक, डाऊ जोन्स, हँग सेंग, निक्केई, शांघाय, कोस्पी, लंडन सर्व शेअर बाजार एकसाथ धडाम झाले.त्यानंतर ट्रम्प यांनी की चीन वगळता इतर सर्व देशांकडून 90 दिवसांसाठी परस्पर शुल्क आकारणीला ब्रेक लावत असल्याची घोषणा केली. गेल्या आठवड्यात, गुरुवारी, झालेल्या घोषणेनंतर शुक्रवारी शेअर बाजारातील तुफान तेजी दिसून आली, जी मंगळवार आणि बुधवारीही कायम राहिली. विशेष म्हणजे भारतीय शेअर बाजाराने केवळ दोन दिवसांत 2 एप्रिलच्या टॅरिफनंतर झालेल्या नुकसानाची भरपाईच केली नाही तर जगात अव्वल ठरले. ट्रम्प टॅरिफची नुकसान भरपाई या दरम्यान, भारतीय शेअर बाजारात गेल्या तीन दिवसांपासून तेजीचा कल पाहायाला मिळत आहे. बुधवारी, निफ्टी50 निर्देशांक 108.65 अंक किंवा 0.47% वाढीसह बंद झाला तर त्याआधी मंगळवारी निर्देशांकात 2.4% पर्यंत प्रचंड वाढ दिसून आली. यामुळे निफ्टी50 एप्रिलच्या सुरुवातीच्या पातळीवर आले. ब्लूमबर्गच्या मते, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्कामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करणारा भारत पहिला मोठा बाजार बनला आहे.आयात शुल्कामुळे आशियाई बाजारांमध्ये 3% पेक्षा जास्त घसरण झाली पण, देशांतर्गत मार्केट या धक्क्यातून वेगाने सावरला आहे. यावरून असे दिसून येते की जागतिक बाजारात भारताला एक सुरक्षित स्थान म्हणून पाहिले जात आहे. भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेमुळे गुंतवणूकदार भारताला पसंत करत आहेत. गुंतवणूकदारांना वाटते की जागतिक मंदीचा सामना करण्यासाठी भारत अधिक चांगल्या प्रकारे तयार आहे. अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाचा भडका उडाला आहे, ज्याचा फायदा भारताला होऊ शकतो. अनेक कंपन्या चीनमधून बाहेर पडून भारतात आपला व्यवसाय सुरू करू शकतात. तसेच चीन ट्रम्प टॅरिफवर प्रत्युत्तरात्मक कारवाई करत असताना भारत अमेरिकेसोबत व्यापार करार करण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय बाजारावर गुंतवणूकदारांचा भरवसा वाढला गेल्या पाच महिन्यातील सततच्या विक्रीनंतर आता गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत आहे. शेअर्सच्या कमी किमती, आरबीआयकडून व्याजदर कपातीची अपेक्षा आणि कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण या विश्वासवाढीला कारणीभूत ठरत आहेत. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने भारताला मोठा फायदा होईल. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, निफ्टी50 सध्या 18.5 पटीने व्यवहार करत आहे, जे गेल्या 12 महिन्यांतील अंदाजे कमाईवर आधारित आहे. त्याची पाच वर्षांची सरासरी 19.5 असून सप्टेंबरच्या अखेरीस 21 पट होते.



